लाचखोरी प्रकरणी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संचालकांसह ६ जणांना अटक

CBI
नवी दिल्ली – लाचखोरी प्रकरणात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) कार्यालयावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. साईचे संचालक एस. के. शर्मा यांच्यासह सहा जणांना या छाप्यात अटक करण्यात आली आहे. हा छापा साईच्या दिल्लीच्या लोधी हाऊस येथे असणाऱ्या कार्यालयावर टाकण्यात आला.

संचालक एस. के. शर्मासह, कनिष्ठ लेखा अधिकारी हरिंदर प्रसाद, ललित जॉली, व्ही. के. शर्मा, कंत्राटदार मनदीप आहुजा आणि युनूस अशा सहा जणांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार साईच्या अधिकाऱ्यांनी १९ लाखाचे बील मंजुर करण्यासाठी ३ टक्के लाच मागितली होती.

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी या छापेमारी प्रकरणानंतर सांगितले की, भ्रष्टाचाराविरुद्ध यापूढेही कठोर कारवाई केली जाईल. भ्रष्टाचारविरोधी असे आमचे सरकार असून भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तसेच भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी सक्त ताकीद राठोड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Leave a Comment