सेल्फी घेणाऱ्या सैतानाच्या प्रेमळ पुतळ्यावरून स्पेनमध्ये वादळ

satan
सेल्फी घेणाऱ्या सैतानाच्या ‘प्रेमळ’ पुतळ्यावरून स्पेनमध्ये वादळ उठले असून हा पुतळा हटविण्यासाठी कॅथोलिक चर्चने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

माद्रिदच्या उत्तर-पश्चिमेला असलेल्या सेगोविया या शहरात हा पुतळा उभारण्याची योजना आहे. हा सैतानाचा पुतळा पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल, अशी स्थानिक अधिकाऱ्यांना आशा आहे.

मात्र हा पुतळा आपल्या धर्माच्या विरोधी असल्याची भीती रोमन कॅथोलिक चर्चने व्यक्त केली आहे. हा सैतानाचा पुतळा खूपच प्रेमळ दिसतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. चर्चने राबविलेल्या मोहिमेत आतापर्यंत 5,500 स्वाक्षऱ्या गोळ्या झाल्या आहेत. “हे चित्रण कॅथोलिकांसाठी अपमानास्पद आहे. सैतानाला कलेमध्ये तिरस्करणीय दाखविले पाहिजे, मैत्रीपूर्ण आणि मोहक नाही,” असे याचिकेत म्हटल्याचे सीएनएन वाहिनीने म्हटले आहे.

चर्चच्या याचिकेच्या विरोधातही एक याचिका सुरू करण्यात आली असून त्या याचिकेत पुतळ्याचे समर्थन करण्यात आले आहे. या याचिकेच्या बाजूने 2100 स्वाक्षऱ्या मिळाल्या आहेत. जोस अँटोनियो अॅबेला यांनी हा पुतळा तयार केला असून हा माझ्यासाठी दुर्दैवी वाद आहे, असे त्यांनी सांगितले. “हजारो पर्यटक या शिल्पाजवळ स्वत:ची छायाचित्रे काढतील,” असे ते म्हणाले.

सेगोव्हियातील प्रसिद्ध ऐतिहासिक अॅक्वाडक्टजवळ हा 200 मीटर उंचीचा पुतळा बसविण्याची योजना आहे. हे बांधकाम खुद्द सैतानाने केल्याची येथे दंतकथा प्रचलित आहे.

Leave a Comment