आयुष्याकडे जरा सकारात्मकतेने पाहा – सर्वोच्च न्यायालयाकडून प्रशांत भूषण यांची कानउघाडणी

Prashant-Bhushan
प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका, आयुष्याकडे जरा सकारात्मकतेने पाहिल्यास हे जग अधिक चांगले होईल, अशा शब्दांत कार्यकर्ते आणि वकील असलेल्या प्रशांत भूषण यांची सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कानउघाडणी केली.

मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. एल. एन. राव आणि एस. के. कौल यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा सल्ला दिला. लोकपालच्या नियुक्तीच्या संबंधात ही याचिका करण्यात आली होती. या संबंधात सर्व तपशील संकेतस्थळावर मांडण्यात यावेत आणि काय होत आहे, हे लोकांना कळायला पाहिजे असा आग्रह भूषण यांनी धरला होता.

विशेष म्हणजे न्यायालयाने आपला आदेश दिल्यानंतर भूषण यांनी ही मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर मुख्य न्यायाधीश गोगोई यांनी त्यांना मध्येच रोखले. “प्रत्येक गोष्टीकडे केवळ नकारात्मक दृष्टीने पाहू नका. गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहण्यास सुरूवात करा. त्यामुळे हे जग अधिक चांगले होईल. नकारात्मक दृष्टिकोन सोडून द्या,” असे न्या. गोगोई यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्यापासून सकारात्मक विचार करायला सुरूवात करा तरच हे जग अधिक चांगले होईल, असेही न्यायाधीशांनी त्यांना सुनावले.

Leave a Comment