पुणे महापालिकेचा गलथानपणा; पर्वती जलकेंद्रातील पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो

overflow
पुणे – सिंहगड रस्ता, नवशा मारुती-चुनाभट्टी या रस्त्यावर पर्वती जलकेंद्र येथील पाणी पुरवठा विभागाच्या पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्याने पाणी साचले आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरले आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे विस्कळीत झाली आहे.

महापालिका आणि जलसंपदा विभागात धरणातील पाण्यावरुन वाद सुरू असतानाच पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा वॉटर व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने गुरुवारी लाखो लिटर पाणी वाया गेले. सकाळी साडेसहा वाजता घडलेल्या या प्रकारामुळे तब्बल २ तास हे पाणी वाहत होते. हे पाणी इतके होते की रस्त्यावर काही भागात ४ फूट पाणी साचले होते. गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याने सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वतीपर्यंत येणाऱ्या सुमारे १६०० मी मी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात येत होता. मात्र, त्यात अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी काही कळण्याच्या आताच रस्त्यावर आले. पू. ल देशपांडे उद्यानाच्या समोर हे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कसरत झाली. दुष्काळाच्या परिस्थितीत पुण्यात पुन्हा पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment