अमित शहांच्या सांगण्यावरून प्रशांत किशोरना पक्षात घेतले – नीतीश कुमार

nitish-kumar
प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोनदा शिफारस केली होती. त्यामुळे प्रशांत यांना युनायटेड जनता दल (जदयू) पक्षात घेतले, असा गौप्यस्फोट बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी केला आहे.

राजधानी पाटणा येथे मंगळवारी रात्री एका खाजगी वृत्त वाहिनीने आयोजित कार्यक्रमात बोलताना नीतीश कुमार यांनी ही माहिती दिली. प्रशांत यांच्याकडे तुम्ही आपला राजकीय वारसदार म्हणून पाहता का, असा प्रश्न त्यांना करण्यात आला होता.

किशोर यांना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये जदयू पक्षात घेण्यात आले होते आणि नंतर त्यांना एका आठवड्यात राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर बढती देण्यात आली होती. त्यामुळे नीतीश कुमार हे त्यांच्याकडे राजकीय वारस म्हणून पाहत असल्याची चर्चा होती.

“ते आमच्यासाठी नवे नव्हते. ते 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत काम करत होते. काही काळ ते इतरत्र गुंतले होते. कृपया हे जाणून घ्या, की प्रशांत यांना जदयूत घेण्यासाठी अमित शहा यांनीच मला सांगितले होते,” असे ते म्हणाले.

प्रशांत किशोर यांच्यावर माझे खूप प्रेम आहे, परंतु कृपा करून वारसदाराची भाषा करू नका, कारण ही राजेशाही नाही, असे कुमार म्हणाले.

Leave a Comment