फेसबुकच्या 10-ईयर चॅलेंजमध्ये दडले आहे ‘हे’ रहस्य!

MEME
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील अनेक वापरकर्त्यांनी अलीकडेच दहा वर्षांपूर्वीची आणि आताची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहे. यात सामान्य वापरकर्ते आणि प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. मात्र या 10-ईयर चॅलेंजमध्ये एकत्रित होणाऱ्या छायाचित्रांचा वापर फेसबुकसारख्या सोशल मीडिया कंपन्यांकडून होण्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे.

10-ईयर चॅलेंज मेमे नावाचे हे चॅलेंज प्रथम फेसबुकवर व्हायरल झाले. या चॅलेंजमधून मोठ्या प्रमाणातील छायाचित्रे गोळा झाली आहेत. ही छायाचित्रे डाटा कंपन्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालींमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठ्या संख्येने डेटा पुरवत आहेत. यातून वाढत्या वयानुसार चेहऱ्यात होणारे बदल या प्रणालींमध्ये नोंदले जातील, असे तज्ञांनी म्हटले आहे.

अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी याबाबत आपली मते व्यक्त केली आहेत. “चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान सुधारण्यासाठी या चॅलेंजमधून किती डेटा मिळाला आहे, याची कोणाला कल्पना आहे का? तुलनात्मक दृश्य माहिती देण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याचा आणखी चांगला मार्ग कोणता आहे,” असा प्रश्न जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी प्रेसचे संपादकीय संचालक ग्रेग ब्रिटॉन यांनी ट्विटद्वारे केला आहे.

केट ओ’नील या तंत्रज्ञानेही हेच मत व्यक्त केले आहे. “वाढत्या वयानुसार आणि वय ओळखून चेहऱ्याची ओळख पटविण्यासाठी अल्गोरिदम तयार कऱण्यासाठी ही सर्व माहिती कशी वापरली जाऊ शकते, याचा विचार मी करत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment