आपच्या आणखी एका बंडखोर आमदाराचा राजीनामा

Baldev-Singh
आम आदमी पक्षाचे पंजाबमधील आमदार बलदेव सिंह यांनी बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. तसेच पक्ष आपल्या मूलभूत विचारसरणीपासून दूर गेला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

बलदेव सिंह हे पंजाबचे आणखी एक आमदार सुखपाल सिंह खैरा यांचे जवळचे सहकारी मानले जातात. खैरा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा दिला होता.

बलदेव सिंह हे जैतो येथील आमदार आहेत. त्यांनी बुधवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून बलदेव यांनी आपला निर्णय कळविला आहे. पक्षाने आपली मूळ विचारधारा व तत्त्वे पूर्णपणे सोडून दिली आहेत म्हणून मी ‘आप’च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.

केजरीवाल यांची कार्यपद्धती हुकुमशाही, अहंकारी आणि अहंमन्य असल्याचेही बलदेव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. “तुमच्या हुकुमशाही, अहंकारी आणि अहंमन्य कार्यपद्धतीमुळे प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, मेधा पाटकर, किरण बेदी, आशिष खेतान, आशुतोष आणि एच. एस. फुल्कांसारख्या नेत्यांनी पक्ष सोडला किंवा त्यांना अपमानजनक पद्धतीने काढण्यात आले,” असेही त्यांनी म्हटल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

काँग्रेसशी संगनमत करणे आणि काँग्रेसच्या जवळ जाणे हे संधीसाधूपणाचे आणखी एक राजकीय उदाहरण आहे. त्यामुळे भारतीय लोकांना धक्का बसला आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Leave a Comment