जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार इंद्रा नुयी?

indra-nooyie
नवी दिल्ली – जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्ष इंद्रा नुयी असून याबाबत व्हाइट हाऊस प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इंद्रा यांच्याशिवाय या शर्यतीत ट्रेझरी विभागाचे अधिकारी डेव्हिड मालपास आणि ओव्हरसीज प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे (ओपिक) अध्यक्ष रे वॉशबर्न यांचाही समावेश आहे.

१ फेब्रुवारीपासून पदमुक्त होणार असल्याची अचानक घोषणा विद्यमान अध्यक्ष जिम याँग किम यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांनी नवा अध्यक्ष शोधणे सुरू केले. या तिघांच्या नावांची तेव्हापासून चर्चा सुरू झाली. इंद्रा नुयी यांनी ऑक्टोबरमध्ये पेप्सिको कंपनी सोडली होती. मालपास हे परराष्ट्र मंत्रालयात ट्रेझरीचे अंडर सेक्रटरी आहेत. तर वॉशबर्न ऑगस्ट २०१७ पासून ओपिकचे अध्यक्ष आहेत. या तिघांची नावे जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड १९४९ पासून अमेरिका करते. आपला कार्यकाळ संपण्याच्या तीन वर्षे आधीच किम यांनी जागतिक बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष २०२२ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता. अनेक प्रकरणांमध्ये ट्रम्प प्रशासनाबरोबरील मतभेदामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment