ऑस्ट्रेलिया विरोधातील एका शतकाच्या साहाय्याने विराटची 5 विक्रमांना गवसणी

virat-kohli
सिडनी – भारताने काल खेळल्या गेलेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखत पराभूत केले. भारताने या विजयासह मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. भारतीय कर्णधार विराट कोहलीने सामन्यात १०४ धावांची खेळी करताना संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कार तर मिळालाच त्याचबरोबर त्याने ‘5’ विक्रमांना गवसणी देखील घातली आहे.

११२ चेंडूत १०४ धावा करताना विराटने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. विराटने या शतकीय खेळीबरोबरच विदेशात सर्वाधिक शतक झळकवण्याच्या बाबतीत सनथ जयसूर्याला (२१ शतके) मागे टाकले आहे. विदेशात विराटने आतापर्यंत २२ शतके बनवली आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावे विदेशात सर्वात जास्त शतके बनवण्याचा विक्रम आहे. त्याने २९ शतके केली आहेत.

विराटचे हे आंतरराष्ट्रीय सामन्यात ६४ वे शतक ठरले. त्याने या शतकाबरोरच कुमार संगकाराला एकूण शतकाच्या बाबतीत मागे टाकले. आंतरराष्ट्रीय सामन्यात संगकाराने ६३ शतके केली आहेत. या यादीत १०० शतके बनवून सचिन पहिल्या क्रमांकावर आहे. तर, ७१ शतकासह रिकी पॉन्टिंग दुसऱ्या स्थानावर आहे. या बाबतीत विराट आता तिसऱ्या स्थानावर आला आहे.


गेल्या ३ वर्षापासून विराट कोहलीने १५ जानेवारी या दिवशी शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. १५ जानेवारी २०१७ आणि २०१९ साली एकदिवसीय तर, १५ जानेवारी २०१८ साली कसोटीत त्याने शतक केले आहे. एकाच तारखेला सलग ३ वर्ष शतक झळकावणारा विराट पहिलाच फलंदाज आहे.

भारताने विराट कोहलीच्या शतकीय खेळीच्या बळावर ३२ वेळा सामना जिंकला आहे. तो आता याबाबतीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. सचिन तेंडुलकरने ३३ वेळा असा पराक्रम केला आहे.

Leave a Comment