ब्रिटनच्या संसदेने फेटाळला पंतप्रधान थेरेसांचा ‘ब्रेक्झिट’ करार

theresa-may
लंडन – ब्रिटन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला ब्रेक्झिट म्हणजेच युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा करार बहुमताने खासदारांकडून फेटाळण्यात आल्यामुळे ब्रेक्झिटचा प्रश्न जटील बनला आहे. आज थेरेसा मे यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार आहे.

हा ठराव ६३४ खासदारांच्या ब्रिटनच्या कनिष्ठ सभागृहात ४३२ विरुद्ध २०२ असा फेटाळण्यात आला. थेरेसा यांना सत्तेत असतानाही बहुमत मिळवणे शक्य न झाल्यामुळे त्यांच्याच हुजूर पक्षाच्या ११८ सदस्यांनी ब्रेक्झिटविरोधात मतदान केले. मे यांच्याविरोधात मजूर पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते जेरेमी कॉर्बीन यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. यावर आज मतदान घेतले जाईल. कराराच्या चर्चेदरम्यान कॉर्बिन यांनी सडकून टीका केली. हा करार त्यांनी विनाशकारी असल्याचे म्हटले आहे.

तर कराराची बाजू पंतप्रधान मे यांनी मांडली. त्यांनी यावेळी पक्षीय राजकारण बाजूला ठेवण्यास सांगितले. त्या म्हणाल्या, की आपल्या सर्व सदस्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हे महत्वपूर्ण मतदान आहे. आज आपणा सर्वांना निर्णय घ्यायचा आहे. येत्या दशकात आपल्या देशाचे भवितव्य काय असणार आहे, हे या करारानंतर ठरणार आहे. पण, मे यांच्या या आव्हानानंतरही त्यांच्या बाजूने सदस्यांनी कौल दिला नाही. दरम्यान, ब्रिटनने युरोपीय महासंघामधून बाहेर पडावे असा कौल ५० टक्के मतदारांनी २०१६ मध्ये दिला होता. त्यानंतर ब्रिटनने महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पण, या मतदानानंतर ही प्रक्रिया अडखळली आहे.

Leave a Comment