पुणे विद्यापीठातील संशोधकांकडून बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध

frog
पुणे – बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. ‘फेजेर्वर्या मराठी’ असे नामकरण पश्चिम घाटात आढळणाऱ्या क्रिकेट फ्रॉगच्या प्रजातीतील या नव्या प्रजातीचे करण्यात आले.

‘झुटेक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नव्या प्रजातीच्या शोधाविषयीचे संशोधन प्रसिद्ध झाले. विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे संशोधक डॉ. समाधान फुगे, कल्याणी भाकरे, रामनाथ आंधळे, प्रा. आर. एस. पंडित यांनी झुलॉजीकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाचे डॉ. के. पी. दिनेश यांच्या सहकार्याने इंटिग्रेटेड टॉक्सोनॉमिक अ‍ॅप्रोचचा (ध्वनिशास्त्र, आकारशास्त्र, डीएनए बारकोडिंग) वापर केला. केवळ महाराष्ट्रात नवी प्रजाती आढळत असल्याने त्याला मराठी नाव देण्यात आले. पुणे जिल्ह्य़ातील ताम्हिणी, लोणावळा घाट परिसरात, तसेच रायगड आणि नगर जिल्ह्य़ातील काही भागात नवीन प्रजातीचा बेडूक सापडू शकतो.

प्राथमिक अभ्यासानुसार असे आढळून आले, की मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात मराठी फेजेर्वर्या बेडकाचे प्रजनन होते. आपल्या गळ्याखाली असलेल्या ध्वनिउत्पादक पिशवीतून नर बेडूक आवाज उत्पन्न करतो. नर बेडूक सर्वसाधारणपणे पाणवठय़ाजवळ बसून आवाज करतो. या प्रजातीसाठी तो वैशिष्टय़पूर्ण आहे. संशोधनासाठी या आवाजांचा उपयोग अधिक होईल. झुलॉजीकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियातील प्राणी वर्गीकरण तज्ज्ञांच्या मतानुसार पश्चिम घाटाची रचना आणि हवामानामुळे आणखी प्रजातींचा शोध लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे. नवीन प्रजाती ही पश्चिम घाटातील क्रिकेट फ्रॉग वर्गातील सर्वात जुना वंश आहे.

Leave a Comment