भारतीय मूळ असलेल्या अधिकाऱ्याचा ट्रम्प सरकारमधून राजीनामा

Raj-Shah
व्हाईट हाउस प्रेस कार्यालयातील प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक असलेल्या राज शाह या भारतीय मूळ असलेल्या अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. एका अॅडव्होकसी संस्थेत सहभागी होण्यासाठी शाह यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारला रामराम केला आहे. यामुळे अलीकडच्या काळात ट्रम्प सरकारमधून बाहेर पडलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आता शाह यांचेही नाव सामील झाले आहे.

शाह हे 34 वर्षांचे असून ते ट्रम्प यांनी जानेवारी 2017 मध्ये सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या सरकारचा भाग होते. ते सध्या व्हाईट हाऊसचे उप प्रवक्ता होते. तसेच रिपब्लिकन राष्ट्रीय समितीतील ते संशोधक होते. सर्वोच्च न्यायालयात न्या. ब्रेट एम कॉवनाह यांची नियुक्ती करण्यासाठी सिनेटच्या सुनवाणीसाठी त्यांना तयार करण्याचे काम नुकतेच त्यांच्यावर सोपवण्यात आले होते.

शाह हे आता बलार्ड पार्टनर्स कंपनीची प्रकाशन शाखा असलेल्या ‘मीडिया ग्रुप’चे नेतृत्व करतील,असे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. ही एक अॅडव्होकसी संस्था असून तिची कार्यालये फ्लोरिडा आणि वॉशिंग्टनमध्ये आहेत. डेमोक्रेट नेते जेमी रूबिन यांच्यासोबत ते काम करतील. रूबिन हे माजी परराष्ट्रमंत्री मेडेलिन अलब्राईट यांचे प्रवक्ते होते.

व्हाईट हाऊसची जनसंपर्क कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण अन्य सरकारी संस्थांमध्ये गेले आहेत किंवा ट्रम्प सरकारमधून पूर्णपणे बाहेर पडले आहेत. यातच शाह यांचीही भर पडली आहे.

Leave a Comment