फेसबुक स्थानिक बातम्यांसाठी करणार 30 कोटी डॉलरची गुंतवणूक

facebook
स्थानिक बातम्या कार्यक्रम, भागीदारी आणि इतर उपक्रमांमध्ये पुढील तीन वर्षांत 30 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा फेसबुकने केली आहे.

स्थानिक वृत्तवाहिनींसाठी वार्तांकन करण्यासाठी हा पैसा देण्यात येणार आहे. वृत्त उद्योगात नफा घटत असून छापील वृत्तपत्रांचा खप घसरत आहे. यासाठी गुगल आणि फेसबुकला दोष देण्यात येतो. या पार्श्वभूमीवर फेसबुकने हा निर्णय जाहीर केला आहे.

फेसबुकच्या जागतिक वृत्त भागीदारी कार्यक्रमाचे प्रमुख कॅम्पबेल ब्राउन म्हणाल्या, “हा उद्योग प्रचंड मोठ्या संक्रमणातून जात असून ही प्रक्रिया दीर्घकाळापासून सुरू आहे. पत्रकारितेचे भविष्य कसे असेल, हे आपल्यापैकी कोणालाच माहीत नाही परंतु आम्ही उपाय शोधण्यात मदत करू इच्छितो.”

फेसबुकने गेल्या वर्षभरात स्थानिक बातम्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच वापरकर्त्यांना स्वारस्य असलेल्या स्थानिक वृत्तवाहिनींना प्रोत्साहित करण्याच्या मार्गांची चाचणी करत आहे. कंपनीने “टुडे इन” नामक एक सुविधा सुरू केली आहे. यात स्थानिक बातम्या आणि माहितीसहित हरविलेल्या व्यक्ती, वाहतुकीतील बदल, गुन्हेगारीच्या बातम्या आणि शाळांच्या घोषणा दाखविल्या जातात. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या शेकडो शहरांमध्ये ही सेवा सुरू आहे. वापरकर्त्यांनी आपल्यासाठी उपयुक्त स्थानिक माहिती अधिक प्रमाणात दाखविण्याची मागणी केली होती, असे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment