काँग्रेसची सप-बसप आघाडीवर टीका

alliance
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी केली आहे. काँग्रेसला या आघाडीपासून दूर ठेवण्यात आल्यामुळे भाजपला फायदा होईल. भाजपच्या जाळ्यात दोन्ही पक्ष अडकले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.

या आघाडीवर काँग्रेस प्रवक्ते आर. पी. एन. सिंह म्हणाले, की धर्मनिरपेक्ष मतांचे उत्तर प्रदेशात विभाजन व्हावे ही भाजपची इच्छा आहे. ते याच प्रयत्नात होते. त्यांच्या या खेळीला समाजवादी आणि बसपच्या आघाडीने बळ मिळाले आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपविरोधी पक्ष एकत्र यावेत. मतांचे विभाजन होऊ नये असा प्रयत्न होत आहे. उत्तर प्रदेशात सुद्धा हेच व्हायला पाहिजे होते, असे सिंह म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने युती केली असून लोकसभेच्या ८० जागांपैकी २ जागा त्यांनी काँग्रेससाठी सोडल्या आहेत. तर २ जागा छोट्या पक्षासाठी सोडल्या आहेत. दोन्ही पक्ष ३८ – ३८ जागांवर निवडणूक लढणार आहेत. बसप प्रमुख मायावती यांनी त्यांच्या वाढदिवाशी निवडणुकांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, की आमच्या युतीमुळे भाजप आणि इतर पक्षांची झोप उडाली आहे. देशात कुणाचे सरकार बनेल हे उत्तर प्रदेश ठरवेल असे त्या म्हणाल्या. समाजवादी आणि बसपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले, की जुने हेवेदावे विसरुन जा. निवडणुकीत एकदिलाने लढा. लोकसभा निवडणुकीतील विजय हेच माझे सगळ्यात मोठे बर्थ डे गिफ्ट असेल.

Leave a Comment