महिला स्वॅट कमांडो तैनात करणारे दिल्ली पहिले राज्य

swat1
नजरेचे पाते लवते न लवते तो पर्यंत शत्रूचा खात्मा करण्यास सक्षम असे पहिले महिला कमांडो दल अतिशय तत्परतेने त्यांची जबाबदारी निभावत आहे. महिला स्वॅट कमांडो दल तैनात करणारे दिल्ली हे भारतातील पहिले राज्य असून गृहमंत्री राजनाघसिंग यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये दिल्ली पोलिसात या दलाची भरती केली आहे. विशेष म्हणजे ३६ कमांडो असलेल्या या दलात पूर्वोत्तर राज्यातील महिलांचा समावेश आहे. त्यात आसाम मधून १३, अरुणाचल आणि सिक्कीम मधून प्रत्येकी ५ तरुणींचा समावेश आहे.

swat
२००९ मध्ये जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांशी मुकाबला करू शकेल असे कमांडो पोलीस दलात हवेत याची जाणीव झाली होती. त्यामुळे याच साली स्वॅट कमांडो दलाची स्थापना केली गेली. स्वॅटचा फुलफॉर्म स्पेशल वेपन्स अँड टॅक्टीक्स असा असून एनएसजी कमांडो प्रमाणेच त्यांना प्रशिक्षण दिले जाते. स्वॅट कमांडो दलात २८ वर्षाखालच्या युवती नेमल्या गेल्या असून त्यांचे मुख्य काम दिल्ली एनसीआर परिसरात दहशतवादी हल्ले अथवा मोठ्या दुर्घटना घडल्या तर त्यांचा निपटारा करणे हे आहे.

swat2
इस्रायल मध्ये रक्षक दलाना कर्व मागा नावाचे एक खास प्रशिक्षण दिले जाते. त्यात प्रशिक्षित कमांडो शस्त्राविनाच शस्त्रधारी हल्लेखोराचा सामना करू शकतात. महिला स्वॅट कमांडो दलाला असे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात मुष्टियुद्ध, कुस्ती, एकीडो, ज्युडो, कराटे यांचे प्रशिक्षण आहे त्याचबरोबर अतिघातक शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण आहे. एमपी ५ सबमशीन गन पासून ४५ कॅलिबर गन मधील सर्वोत्कृष्ट झिलॉक २१ पिस्टल पर्यंतची सर्व शस्त्रे या महिला कमांडो सहज हाताळत आहेत.