वंशवादी टिप्पणी केल्याबद्दल नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचे मान-सन्मान रद्द

James-Watson
एका वृत्तपटात वंशवादी टिप्पणी केल्याबद्दल डीएनए संशोधनातील अग्रणी नोबेल विजेते शास्त्रज्ञ गोत्यात आले आहेत. एके काळी ते जिथे काम करत त्या प्रयोगशाळेने त्यांचे शास्त्रज्ञाचे मान-सन्मान रद्द केले आहेत.

जेम्स वॉटसन असे या शास्त्रज्ञाचे नाव असून ते सध्या 90 वर्षांचे आहेत. त्यांनी 1950 च्या दशकात ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ रोसलिंड फ्रँकलिन यांच्या कामावर आधारित डीएनएची डबल हेलिक्स संरचना शोधण्यात फ्रान्सिस क्रिक यांच्यासह महत्त्वाचे योगदान दिले होते. कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय लोकांमध्ये गुणसूत्रांमुळे बुद्धिमत्तेमध्ये फरक पडतो, असे त्यांनी पीबीएस वाहिनीवरील एका वृत्तपटात म्हटले होते. “अमेरिकन मास्टर्स: डिकोडिंग वॉटसन” नावाचा हा वृत्तपट 2 जानेवारी रोजी प्रसारित झाला होता.

न्यूयॉर्कच्या लॉंग आयलंड येथील कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरीने (सीएसएचएल) त्यांची ही शेरेबाजी खेदजनक असल्याचे म्हटले होते. वॉटसन हे या प्रयोगशाळेचे 1968 ते 1993 या काळात संचालक होते.

“डॉ. वॉटसन यांनी व्यक्त केलेले हे बिनबुडाचे आणि बेपर्वा वक्तव्य आम्ही नाकारतो. हे वक्तव्य निषेधार्ह आणि विज्ञानाचा आधार नसलेले आहे,” असे या प्रयोगशाळेने म्हटले आहे.

डॉ. वॉटसन यांनी 2007 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याबद्दल सीएसएचएलने त्यांना त्यांच्या प्रशासकीय कर्तव्यांपासून मुक्त केले, पण आतापर्यंत त्यांच्या मानद उपाध्या कायम ठेवण्यात आल्या होत्या.

Leave a Comment