‘त्या’ कारवाईबद्दल मी पोलीस आणि पंतप्रधान मोदींचे आभारच मानतो

kanhiya-kumar
नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी कन्हैया कुमारसह इतर काही जणांवर देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल १२०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. कन्हैया कुमारने या कारवाईवर प्रतिक्रिया देताना या घटनेमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. तसेच आरोपपत्र दाखल केल्याची बातमी खरी असेल तर पोलीस आणि पंतप्रधान मोदींचे मी आभारच मानतो, असे म्हणत कन्हैयाने याची खिल्ली उडवली. आरोपपत्र घटनेच्या तीन वर्षानंतर निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच दाखल करण्यात आल्याचे कन्हैया म्हणाला. तसेच या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचे कन्हैया कुमारने यावेळी सांगितले.

फेब्रुवारी २०१६ च्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी प्रमुख कन्हैया कुमार, उमर खालिद यांच्यासह ८ जणांवर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. आमच्याकडे कन्हैया, उमर खालिद यांच्यासह जम्मू काश्मीरच्या सात विद्यार्थ्यांच्या विरोधात पुरावा असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तब्बल १२०० पानी आरोपपत्र या प्रकरणातील आरोपींवर दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्यावर विद्यापीठाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीच्या विरोधात घोषणा दिल्याचा आरोप आहे. कन्हैया कुमारला या प्रकरणी अटक केल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती. सत्ताधारी भाजपच्या सांगण्यानुसार पोलीस कारवाई करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी त्यावेळी केला होता.

Leave a Comment