मेक्सिको सीमेवर सप्टेंबरपर्यंत राहणार अमेरिकी सैनिक: पेंटागॉन

soldier
मेक्सिकोला लागून असलेल्या सीमेवर आपले सैन्य अभियान 30 सप्टेंबरपर्यंत चालू ठेवण्याची घोषणा अमेरिकेच्या संरक्षण खात्याने (पेंटागॉन) केली आहे. पेंटागॉनच्या या निर्णयामुळे या सीमेवर अमेरिकी सेनेच्या तैनातीला एक वर्ष पूर्ण होईल.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अंतर्गत सुरक्षा विभागाने विनंती केल्यानंतर पेंटागॉनने ऑक्टोबर 2008 मध्ये या सीमेवर 4500 सक्रिय सुरक्षा सैनिक तैनात केले होते. मेक्सिकोतून अमेरिकेत येणाऱ्या हजारो स्थलांतरितांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. ही मोहीम सुरूवातीला डिसेंबर 2018 मध्ये संपणार होती. तिला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ती सप्टेंबरपर्यंत चालेल. अंतर्गत सुरक्षा खात्याने केलेल्या विनंतीनुसार संरक्षण मंत्र्यांचे हंगामी सचिव पॅट्रिक शानाहन यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यत ही मोहीम राबविण्यास मंजुरी दिली आहे, असे पेंटागॉनने निवेदनात म्हटले आहे.

सध्या या सीमेवर 2350 सैनिक आहेत. या मोहिमेला मुदतवाढ देत असताना सैनिकांच्या मिशनमध्ये थोडा बदल करण्यात येईल. सैनिकांना हवाई गस्तही पुरविण्यात येईल. काही तारा अजूनही टाकायच्या आहेत, असेही खात्याच्या वतीने सांगण्यात आले. अतिरिक्त कामासाठी किती सैनिक लागतील, हे अद्याप पेंटागॉनने निश्चित केलेले नाही, असे पॉलिटिको या संकेतस्थळाने म्हटले आहे.

Leave a Comment