आता मिळणार खारी अंडी

eggs
उकडलेले अंडे हा अनेकांच्या न्याहारीचा भाग आहे. बहुतेक वेळा उकडलेल्या अंड्यावर मीठ आणि मिरपूड घालून ते खाल्ले जाते. मीठ घालताना ते सर्वत्र समान लागेल याची खात्री नसते. किंवा अनेकदा मीठ घालायचा कंटाळा केला जातो. अश्या लोकांसाठी आता मीठ असलेली अंडी उपलब्ध होत आहेत.

सेन्ट्रल एव्हिएशन रिसर्च इंस्टीट्युट( सीएआरआय)ने कोंबडीची खारी अंडी विकसित केली आहेत. यामुळे अंड्यातील पिवळ्या बलकातही मिठाचा अंश असेल आणि अंडे उकडले कि मीठ वरून घेण्याची गरज राहणार नाही तसेच ऑमलेट बनवितानाही मीठ घालण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्थात अशी अंडी बाजारात कुठेही मिळणार नाहीत. कारण सीएआरआयने या अंड्यांच्या व्यावसायिक वापरासाठी तसेच शेतकऱ्याना परवाने दिले आहेत. असा परवाना मिळविण्यासाठी ५५०० रु. मूल्य आकारले जात आहे.

संस्थेतील संशोधक या संदर्भात म्हणाले, अशी अंडी घराच्या घरी तयार करता येऊ शकतात. त्यासाठी वीज किंवा मशीनची गरज नाही. ग्रामीण भागात यामुळे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. नेहमीचे उकडलेले अंडे २४ तास तसेच ठेवले तर खराब होण्याची शक्यता असते मात्र अशी खारी अंडी ४८ तास चांगल्या स्थितीत राहू शकतात.

अशी अंडी बनविण्याचे तंत्र अगदी सोपे आहे. कच्चे अंडे फूडग्रेड सोल्युशनमध्ये प्रथम २० मिनिटे बुडवून ठवले जाते व नंतर दुसर्या द्रवात ४२ तास बुडविले जाते. यामुळे मीठ अंड्यात शोषले जाते. या पद्धतीने फ्लेव्हर्ड अंडी बनविण्याचे प्रयोग सुरु आहेत. तसेच रक्तदाब असलेल्या व्यक्तीसाठी सोडियम ऐवजी पोटेशियम असलेली अंडी तयार केली जात आहेत असे समजते.

Leave a Comment