पाकिस्तानात व्हॅलेंटाईन डे होणार सिस्टर्स डे!

valentine
प्रेमीजनांसाठी जिव्हाळ्याचा असलेला व्हॅलेंटाईन डे यंदा पाकिस्तानात सिस्टर्स डे म्हणून साजरा होणार आहे. व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्यासाठी आणि तरुणांपुढे नवा आदर्श ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

फैसलाबाद कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरु झाफर इकबाल रंधावा यांनी ही घोषणा केली आहे. महिलांना आदर दाखविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“पाश्चिमात्य जगाच्या उलट, आमच्या धार्मिक मूल्यांमध्ये महिलांना आदर देण्याबद्दल सांगितले आहे आणि त्यांच्या हक्काच्या रक्षणाची हमी दिली आहे,” असे इकबाल यांनी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

ज्या कोणाला हा उत्सव साजरा करायचा असेल त्याने मुलींना स्कार्फ व अबाया भेट द्यावेत, असे विद्यापीठाने म्हटल्याचे इंडिया टुडेने म्हटले आहे.
व्हॅलेंटाईन डेला बहिणींचा दिवस म्हणून साजरा करण्याची आपली कल्पना मान्य होईल अथवा नाही, याबाबत आपण साशंक आहोत. मात्र पाकिस्तानची संस्कृती आणि इस्लामशी हे सुसंगत आहे, असे रंधावा यांनी डॉन वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

“भाऊ आणि बहीण यांच्या प्रेमापेक्षा अन्य कोणते प्रेम मोठे आहे,” असा प्रश्नही रंधावा यांनी केला.

पाकिस्तानात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 2017 आणि 2018 मध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घातली होती. तसेच व्हॅलेंटाईन डेशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा प्रचार न करण्याबाबत माध्यमांना समज दिली होती.

Leave a Comment