शाहरुख आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही – रोहित शेट्टी

rohit-shetty
‘सिम्बा’ चित्रपटाच्या यशामुळे बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी चर्चेत असुन बॉक्स ऑफिसवर ‘सिम्बा’ला धमाकेदार प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट कमाईच्या बाबतही अव्वल ठरला. पहिल्यांदाच रोहित शेट्टीने रणवीर सिंग, सारा अली खानसोबत काम केले होते. पण मागच्या वर्षी त्याचा प्रदर्शित झालेला ‘दिलवाले’ हा चित्रपट फारसा गाजला नाही. त्यामुळे शाहरुख आणि त्याच्यात वाद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या.

रोहित शेट्टीने अलिकडेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. रोहितला ‘सिम्बा’ला मिळत असलेल्या यशानिमित्त त्याच्या ‘दिलवाले’ चित्रपटाबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. तो यावेळी म्हणाला, की शाहरुख आणि माझ्यात जर कोणत्याही प्रकारचा वाद असता, तर रेड चिलीज अंतर्गत मी माझ्या ‘सिम्बा’ चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन केले नसते. कोणत्याही प्रकारचा वाद शाहरुख आणि माझ्यात निर्माण झाला नाही. आमच्या वादाच्या ज्याही चर्चा झाल्या, त्या निव्वळ अफवा आहेत.

‘सिम्बा’च्या क्रेडीट सिन्सला लक्षपुर्वक पाहिले, तर डीआय आणि कलरचे क्रेडीट शाहरुखच्या कंपनीला देण्यात आले आहे. येथेच ‘झिरो’ चित्रपटाचेही एडिटींग झाले होते. आमचा एक चित्रपट गाजला नाही, याचा अर्थ असा होत नाही, की आमच्यात वाद निर्माण झाला’, असेही रोहितने सांगितले आहे. रोहित शेट्टीच्या ८ चित्रपटांचा १०० कोटी क्लबमध्ये समावेश झाला आहे. ‘सिम्बा’ने देखील २०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटातून त्याने त्याच्या आगामी चार चित्रपटांची घोषणा केली आहे. ‘सिम्बा-२’, ‘सूर्यवंशी’, ‘सिंघम-३’ आणि ‘गोलमाल-५’ हे चित्रपट घेऊन तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ‘सिम्बा’ प्रमाणेच त्याचे पुढचे चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरतील का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Leave a Comment