पाकिस्तानातील ग्वादार बंदरात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार सौदी अरेबिया

saudi-arebia
इस्लामाबाद – सौदी अरेबियाने पाकिस्तानतील ग्वादार बंदरात १० बिलियन डॉलरचा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा सौदीचे ऊर्जामंत्री खलिद अल फलिह यांनी केली. यामुळे कर्जाच्या वाढत्या ओझ्याने डबघाईला आलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. सौदीने गेल्या वर्षीदेखील पाकिस्तानला ६ बिलियन डॉलरची आर्थिक मदत केली होती.

सौदी अरेबिया चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असून फेब्रुवारी महिन्यातील पाकिस्तान भेटीत सौदीचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान या करारावर स्वाक्षरी करतील, अशी माहिती ऊर्जामंत्री खलिद अल फलिह यांनी यावेळी दिली. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत ऊर्जा निर्मिती प्रकल्प, हायवे, रेल्वे तसेच बंदरांचा विकास करण्यासाठी चीनने तब्बल ६० बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. ग्वादारमध्ये तेलशुद्धीकरणाचा हा प्रकल्प उभा केल्याने सौदीदेखील चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले.

इम्रान खान ऑगस्टमध्ये पंतप्रधानपदी निवडून आल्यापासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था बिघडतच चालली आहे. सरकारकडील परकीय गंगाजळी संपत आल्याने कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानला सौदी अरेबिया, चीन यांसारख्या देशांबरोबरच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने बेलआऊट पॅकेज जाहीर करून अर्थव्यवस्था सावरण्यास मदत केली होती. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आर्थिक मदतीसाठी मित्रदेशांना आव्हान करत आहेत.

Leave a Comment