पाणघोड्याच्या पुतळ्याची चोरी – पोलिस संभ्रमात, नेटकरी गोंधळात

hippo
ब्रिटनच्या एका बागेतून भव्य असा ब्राँझचा पाणघोड्याचा पुतळा चोरीला गेला आहे. या चोरीमुळे एकीकडे पोलिस संभ्रमात असताना नेटकरीही गोंधळात पडले आहेत.

केंटजवळील ट्यूनब्रिज वेल्स येथील चिल्स्टोन गार्डन ओर्नामेंट्स येथे हा पुतळा होता. शुक्रवारी केंट पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात या चोरीची माहिती देण्यात आली होती. हा पुतळा 1,500 पौंड वजनाचा असून 6.5-फूट उंच आहे. बुधवारी कोणी तरी तो चोरला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

चिल्स्टोन या कंपनीची स्थापना 1953 मध्ये झाली होती. ती बाग-बगिच्यांना सजविण्यासाठी हाताने केलेल्या वस्तू पुरवते. गेल्या साठ वर्षांत ब्रिटनमधील काही प्रतिष्ठित ग्राहकांसाठी आम्ही दगडी पुतळे पुरविले आहेत, असा कंपनीचा दावा आहे.

“आमचे सुंदर शिल्प कोणीतरी चोरून नेले आहे, यामुळे आम्ही खूप दुःखी आहोत. आमच्या बागेचे वैशिष्ट्य म्हणून ही कलेची वस्तू दाखविणे आम्हाला आवडतो आणि ते कोणीतरी नेले, यामुळे आम्ही खूप निराश आहोत,” असे कंपनीच्या फेसबुक पेजवर शनिवारी म्हटले आहे .

हा हिप्पो अत्यंत जड आणि पूर्वी तो उचलण्यासाठी पाच जण लागले होते, असे पोलिस कॉन्स्टेबल निक लिंगहॅम यांनी सीएनएन वाहिनीला सांगितले.

ज्यांनी तो नेला त्यांना एखादे अवजड वाहन लागले असेल आणि ते त्यांनी क्रेनने उचलले असावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कोणी हा पुतळा पाहिल्यास माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ही निश्चितपणे जादू आहे, असे काही जणांनी म्हटले आहे तर काही जणांनी प्राणिसंग्रहालयात शोध घेण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment