मार्चपासून बंद होणार मोबाईल वॉलेट ?

mobile-wallet
नवी दिल्ली – येत्या मार्च महिन्यापासून तुमच्या Paytm, Mobikwik सारख्या मोबाईल वॉलेटची सेवा बंद होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी करण्यात आलेल्या केवायसीची डेडलाईन देशात मोबाईल वॉलेट सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या पूर्ण करू शकणार नसल्यामुळे या कंपन्यांच्या ९५ टक्के युझर्सचे मोबाईल वॉलेट बंद होऊ शकतात.

ऑक्टोबर २०१७ मध्ये प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट आणि मोबाईल वॉलेट सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना आरबीआयने एक डेडलाईन जारी केली होती. युझर्सची संपूर्ण माहिती केवायसीच्या माध्यमातून घेण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आले होते. या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या बहुतांश युझर्सचे केवायसी डेटाचे बायोमॅट्रिक किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन अद्याप झालेले नाही.

सर्व मोबाईल वॉलेट कंपन्या गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आधार कार्डवर निर्णय आल्यानंतर बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन्सच्या पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी करण्यात आलेल्या डेडलाईनला पूर्ण करण्यासाठी मोबाईल वॉलेट सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या व्हिडिओ आधारित पडताळणी किंवा एक्सएमएल आधारित पडताळणी व्यवस्था आणण्याच्या तयारीत आहेत. पण सध्या आरबीआयने याला हिरवा कंदिल दिलेला नाही.

तुम्हीही जर Paytm, Mobikwik सारखे मोबाईल वॉलेट वापरता आणि केवायसीची प्रकिया पूर्ण केली नसेल तर तुमचे मोबाईल वॉलेट मार्चपासून बंद होऊ शकते. सध्या मोबाईल वॉलेट कंपन्या फिजिकल किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनच्या वैकल्पिक व्यवस्थेची वाट पाहत आहेत.

Leave a Comment