मायावती आणि अखिलेश यांना शुभेच्छा देण्यासाठी तेजस्वी यादव उत्तर प्रदेशात

tejaswi-yadav
लखनौ – उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्ष (बसप) आणि समाजवादी पक्ष (सपा) यांनी आघाडी केल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना शुभेच्छा देण्यासाठी लखनौ गाठले. त्यांनी या दरम्यान बसप अध्यक्षा मायावती यांची भेट घेतली.

त्यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ‘त्यांना’ (भाजप) नागपुरीया कायद्याने बदलायचे आहे, असा टोलाही भाजपला लगावला. जातीगत आरक्षण भाजपला पूर्णतः नष्ट करायचे असल्याचेही यादव यावेळी म्हणाले. लालू प्रसाद यादव यांची ईच्छाही बसप आणि सपा यांनी लोकसभा निवडणुकांसाठी आघाडी करावी अशी होती, असेही ते यावेळी म्हणाले.

काँग्रेसला उत्तर प्रेदशामध्ये डावलून समाजवादी पक्ष आणि बसपने आघाडी केल्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला बसपने मोठा धक्का दिला आहे. भाजप आणि काँग्रेस सारख्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांव्यतीरिक्त स्थानिक नेत्यांनी एकत्र येण्याची कवायद सुरू केली आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असे चिन्ह आहेत. यापूर्वी मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पाठिंबा न दिल्याने मायावती यांनी राजकारणात गोंधळ उडवून दिला होता. आता भारतीय राजकारणात तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर खळबळ उडालेली आहे. बिहारमध्ये आरजेडी, काँग्रेस सोबत आघाडी करणार, असे वारे आहेत. पण त्यांच्या या भेटीनंतर बिहारमध्ये सुद्धा काँग्रेसला डावलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment