मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच करणार फराह खान ?

farah-khan
नवोदित कलाकारांना बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये सध्या संधी दिली जात असून अनेक नवे चेहरे २०१९ या वर्षात चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहेत. बॉलिवूडला दीपिका पादुकोणसारखा चेहरा कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शिका असलेली फराह खान हिने दिला आहे. फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिलाही फराह खान बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याचे वृत्त आहे.

२०१७मध्ये मिस वर्ल्डच्या मुकूटावर मानुषीने आपले नाव कोरले होते. तिने आपल्या सौंदर्याची झलक दाखविल्यानंतर आता तिला अभिनयाचीही संधी मिळणार आहे. तिने अलिकडेच फराह खानची भेट घेतली होती. तिची फराहच्या आगामी चित्रपटात वर्णी लागण्याची शक्यता आहे. ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकल्यापासूनच मानुषीच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा होत्या. तिने बॉलिवूडमध्ये यावे, अशी तिच्या चाहत्यांचीही इच्छा होती.

सोशल मीडियावरही मानुषी चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करत असते. बॉलिवूड पदार्पणासाठी तिला चांगल्या स्क्रिप्टची प्रतिक्षा होती. तिला फराह खानच्या आगामी चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली असून त्यावर तिने काम सुरू केल्याचेही बोलले जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण मानुषीने जर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तर दीपिका पादुकोण प्रमाणे तिलाही स्टारडम मिळते का, हे पाहणे रंजक ठरेल.

Leave a Comment