संपूर्ण देशाचे इंटरनेट बंद करणाऱ्या हॅकरला 3 वर्षांची शिक्षा!

hacker
लाइबेरिया या आफ्रिकी देशाचे संपूर्ण इंटरनेट बंद पाडणाऱ्या एका ब्रिटिश हॅकरला सुमारे तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. मध्य लंडनमधील ब्लॅकफिअर्स क्राउन कोर्टाने शुक्रवारी त्याला दोन वर्ष आणि आठ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

डॅनियल केये असे या हॅकरचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. त्याने ऑक्टोबर 2015 मध्ये लोनस्टार या लाइबेरियन मोबाईल कंपनीवर सायबर हल्ला केला होता. त्याने एकामागोमाग एवढे हल्ले केले, की त्या पुढच्या वर्षी या देशातील संपूर्ण इंटरनेट यंत्रणा बंद पडली.

लोनस्टारची स्पर्धक कंपनी सेलकॉम या कंपनीने काये याला पैसे पुरवले होते, असे ब्रिटनच्या राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेने म्हटले आहे. मात्र सेलकॉम कंपनीला त्याच्या कृत्याची माहिती होती का, याबाबत माहिती देण्यात आली नाही.
आपण बॉटनेट तयार केल्याची कबुली त्याने गेल्या महिन्यात दिली होती.

काये याने सायप्रसमध्ये बसून लोनस्टारच्या यंत्रणेवर हल्ले चढविले. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कंपनीला सुमारे 600,000 डॉलर खर्च करावे लागले. त्याला फेब्रुवारी 2017 मध्ये अटक करण्यात आली होती व जर्मनीत परत पाठविण्यात आले होते. तेथेही त्याने डॉयट्शे टेलिकॉम कंपनीवर सायबर हल्ले केल्याची कबुली दिली होती.

Leave a Comment