अमेरिकी अध्यक्षपदाच्या रिंगणात हिंदू उमेदवार – तुलसी गॅबार्ड यांचा दुजोरा

tulasi-gabbard
अमेरिकी संसदेतील पहिल्या हिंदू सदस्य तुलसी गॅबार्ड यांनी 2020 मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. गॅबार्ड या 37 वर्षांच्या असून सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांच्यानंतर डेमोक्रेटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रवेश करणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या आहेत. गॅबार्ड यांच्या रूपाने अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू उमेदवार उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“मी निवडणूक लढण्याचे ठरविले आहे आणि पुढील आठवड्यात मी औपचारिक घोषणा करणार आहे,” असे गॅबार्ड यांनी सीएनएन वाहिनीला शुक्रवारी सांगितले. ही घोषणा केल्यानंतर आपल्या पहिल्या ट्विटमध्ये, गॅबॉर्ड यांनी आपल्या प्रचार मोहिमेत सामील होण्यासाठी देशवासियांना आवाहन केले. “जेव्हा आपण एकमेकांबद्दल आणि आपल्या देशाबद्दलच्या आपल्या प्रेमामुळे एकत्र उभे राहतो तेव्हा असे कोणतेही आव्हान उरत नाही ज्यावर आपण मात करू शकत नाही,” असे त्या म्हणाल्या.

तुलसी गॅबार्ड या डेमोक्रॅटिक पक्षातर्फे चार वेळेस हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्ह्ज् सभागृहात निवडून आल्या आहेत. तरुणपणीच हिंदू धर्म स्वीकारलेल्या गॅबार्ड या भारतीय-अमेरिकन लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्याला रस असल्याचे त्यांनी एमएसएनबीसी न्यूज या वाहिनीशी बोलताना डिसेंबर महिन्यात सांगितले होते. गॅबार्ड यांची ट्रम्प यांच्याशी लढत झाली तर तर अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या त्या पहिल्या हिंदू ठरतील आणि 2020 मध्ये निवडून आल्यास त्या सर्वात तरुण आणि पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील.

नोव्हेंबर 2020 च्या निवडणुकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देण्यापूर्वी त्या वर्षीच्या सुरुवातीपासूनच प्राथमिक निवडणुकांमध्ये त्यांना स्वतःच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या सहकाऱ्यांविरुद्ध लढावे लागेल. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्यासह 12 डेमोक्रॅटिक नेत्यांनी 2020 मध्ये अध्यक्ष ट्रम्प यांना आव्हान देण्यासाठी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Leave a Comment