‘अंगूठा छाप’ म्हटल्याबद्दल पासवान यांची मुलीकडून कान उघाडणी

asha-paswan
बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबरी देवी यांना ‘अंगूठा छाप’ म्हणून त्यांची खिल्ली उडविल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची त्यांच्याच मुलीने कान उघाडणी केली आहे. या प्रकरणी पासवान यांनी माफी मागावी, अशी मागणी आशा पासवान यांनी केली आहे.

पासवान यांनी शुक्रवारी पाटण्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना संबंधित वक्तव्य केले होते. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी 10 टक्के आरक्षण पुरविण्याबाबत सरकारच्या विधेयकाला विरोध केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय जनता दलावर (राजद) टीका केली होती. “त्यांचा (राजद) केवळ घोषणा देण्यावर आणि ‘अंगूठा छाप’ना मुख्यमंत्री बनविण्यावर विश्वास आहे,” असे ते म्हणाले होते.

लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते. त्यावेळी जेमतेम शिक्षण असलेल्या राबरी देवी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. त्याचा संदर्भ पासवान यांच्या वक्तव्याला होता, असे मानण्यात येते.

“पपांनी राबरी देवींचा अपमान केला आहे. माझी आई देखील अशिक्षित होती. त्यामुळेच त्यांनी तिला सोडले. त्यांनी माफी मागितली पाहिजे अन्यथा मी त्यांच्या पक्षाच्या कार्यालयासमोर धरणे देईल,” असे आशा म्हणाल्या.

आशा या पासवान यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या कन्या आहेत. त्यांचे तिचे पती अरुण साधू गेल्याच वर्षी राजदमध्ये दाखल झाले होते. पासवान यांची पहिली पत्नी राजकुमारी देवी समस्तीपूर जिल्ह्यात एकट्या राहतात. पासवान यांनी दुसऱ्या पत्नीपासून झालेला मुलगा चिराग पासवान यांना राजकीय वारस म्हणून पुढे आणले आहे. ते त्यांची दुसरी पत्नी रीना पासवान यांच्यासह राहतात.

Leave a Comment