हेरगिरीबद्दल अटक केलेला ह्युवेईचा कर्मचारी बडतर्फ

huwai
पोलंडमध्ये हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला चिनी कर्मचारी वांग वाईजिंग याला ह्युवेई कंपनीने बडतर्फ केले आहे. वाईजिंग याच्या कृत्याशी कंपनीचा कोणताही संबंध नसल्याचे ह्युवेईने म्हटले आहे.

पोलंडच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वाईजिंग आणि एका माजी पोलिश सुरक्षा अधिकारी यांना अटक केली होती. याबाबत ह्युवेईने एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात वांग वाईजिंगच्या कथित कारवायांशी आपला संबंध नसल्याचा दावा केला आहे. तसेच या घटनेमुळे कंपनीची अप्रतिष्ठा झाली असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचेही ह्युवेईने स्पष्ट केले आहे.

ह्युवेई ही जगातील टेलिकॉम उपकरणांची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. चीनच्या सरकारशी असलेल्या संबंधांमुळे पाश्चिमात्य देशांमध्ये या कंपनीकडे संशयाने पाहिले जाते. ह्युवेईच्या उपकरणांद्वारे चीन हेरगिरी करतो, असा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील अनेक देशांचा आरोप आहे.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया, युएस, कॅनडा, न्युझीलंड आणि ब्रिटन या सर्व देशांनी ह्युवेईच्या नेक्स्ट जनरेशन वायरलेस नेटवर्कसाठी उपकरणे पुरविण्यास बंदी घालून चीनविरोधात मोहीम सुरु केली होती.

डिसेंबरमध्ये कॅनडातील व्हँक्यूवर शहरात ‘युएसकडून इराणवर घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन’ केल्याच्या आरोपाखाली हुवाईच्या चीफ फायनांशियल ऑफिसर मेंग वांचों यांना अटकही करण्यात आली होती.

Leave a Comment