सीमेवर किती पाकिस्तान्यांना अटक केली – डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रश्न

donlad-trump
अमेरिकेत बेकायदा प्रवेश करू पाहणाऱ्या किती पाकिस्तान्यांना अटक केली, असा प्रश्न करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षा सैनिकांना चकीत केले.

ट्रम्प यांनी शुक्रवारी टेक्सासच्या दक्षिणेकडील मेक्सिकोला लागून असलेल्या सीमेचा दौरा केला. यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना स्थलांतरितांवर करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती दिली.

मेक्सिकोला लागून असलेल्या या सीमेवरून दक्षिण आशियाई राष्ट्रांतील अनेक लोकांनी अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच यावेळी मागील आठवड्यात अटक केलेल्या स्थलांतरितांच्या देशाची नावे या अधिकाऱ्यांनी वाचून दाखविली.

“आतापर्यंत या भागात 41 वेगवेगळ्या देशांतील लोकांना पकडले आहे. काल आम्ही मध्य अमेरिका आणि मेक्सिको वगळता इतर देशांतील 133 जणांना अटक केली. यात भारतातील काही व्यक्तींचा समावेश आहे. आम्ही काही पाकिस्तानी, रोमानियन लोकांना पकडले…”, असे कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्याने सांगितले.

त्यावेळी त्याला मध्येच रोखून “किती पाकिस्तानी?” असा प्रश्न ट्रम्प यांनी विचारला. तेव्हा “काल दोन पाकिस्तान्यांना पकडले होते,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment