ट्रम्प यांनी रशियासाठी काम केले का? एफबीयने केला तपास

combo
अमेरिकेची केंद्रीय तपास संस्था एफबीआयचे संचालक जेम्स कोमी यांना पदावरून काढल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियासाठी काम करत होते का, याची चौकशी एफबीआयने सुरू केली होती, असा दावा न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने केला आहे. कोमी यांच्या हकालपट्टीनंतर ट्रम्प यांच्या वर्तनामुळे कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी अत्यंत चिंतित झाले होते, असे वृत्तपत्राने म्हटले होते.

काही निनावी माजी कायदा अंमलबजावणी अधिकारी आणि या तपास प्रक्रियेत सामील असलेल्या व्यक्तींच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे.
ट्रम्प हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य धोका आहेत का, हे या चौकशीतून गुप्तचर खात्याकडून पडताळून पाहण्यात आले. तसेच ट्रम्प हे मुद्दाम रशियासाठी कार्यरत होते किंवा नकळतपणे रशियाकडून प्रभावित झाले होते, हेही या चौकशीत तपासण्यात आले.

ट्रम्प यांच्या रशियाशी संबंधांबाबत एफबीआयचे काही तपासकर्ते आणि उच्च अधिकाऱ्यांना 2016 च्या अध्यक्षपदाच्या प्रचार मोहिमेदरम्यानच संशय आला होता. मात्र एवढ्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण प्रकरणाची चौकशी कशी करावी याबद्दल ते गोंधळलेले असल्यामुळे त्यांनी चौकशी सुरू केली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, ट्रम्प यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. एफबीआयच्या नेतृत्वाने कोणत्याही कारणाशिवाय किंवा पुराव्याशिवाय माझ्या विरोधात तपास सुरू केला होता, असे बातम्यांवरून दिसते असे ट्वीट त्यांनी शनिवारी सकाळी केले.

Leave a Comment