रिपब्लिकन पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढू शकतात उदयनराजे भोसले !

udyanraje-bhosale
मुंबई : एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. या मुलाखतीत त्यांनी उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारली त्यांना मी माझ्या कोट्यातून आमच्या पक्षाची उमेदवारी देऊ तसेच याबाबत आमच्यात तशी बोलणी झाली असल्याचे सांगितले आहे.

शिवसेना आणि भाजपची युती झाली, तर माझ्या पक्षासाठी मला दोन जागा हव्या आहेत. मला शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची जागा हवी, शिवसेनेला त्या बदल्यात पालघरची जागा किंवा दुसरी कोणती हवी असेल तर दिली जाईल. आणि साताऱ्याची दुसरी जागा मला हवी आहे. जर उदयनराजेंना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी दिली नाही, तर त्यांना मी माझ्या कोट्यातून लोकसभेची जागा देणार आहे. आमच्यात तशी बोलणी झाली असल्याचे, रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

सध्या साताऱ्यातून उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. उदयनराजे हे लोकांमध्ये मिळून-मिसळून राहण्यामुळे साताऱ्यातील जनतेच्या पसंतीचे खासदार मानले जातात. त्याचबरोबर राजघराण्याचे वलयसुद्धा उदयनराजेंना आहे. अत्यंत दिलखुलास आणि मनमोकळे व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यासह देशाच्या राजकारणात त्यांची ओळख आहे.

उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 5 लाख 22 हजार मते मिळाली होती. तर भाजप, शिवसेना आणि आरपीआय या आघाडीने ही जागा आरपीआयला बहाल केली होती. त्यांनी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना नावापुरते उभे करण्यात आले. त्यांना 71 हजार मते मिळाली होती.