ट्रम्प म्हणाले – एच-1बी व्हिसात बदल करू

Trump
एच-1बी व्हिसा धारकांना अमेरिकेत राहण्याची निश्चिती होईल, अशा प्रकारचे बदल व्हिसात करू. यामुळे नागरिकत्व मिळवण्यासाठी एक मार्ग त्यांच्यासाठी खुला होईल, असे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केले.

एच-1बी व्हिसासाठी अमेरिका धोरणांमध्ये बदल करण्याची आपली योजना आहे. प्रतिभावंत तसेच उच्च कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना अमेरिकेत करिअर करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ, असे ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्वीट करून सांगितले.

‘‘अमेरिकेतील एच-1बी व्हिसाधारकांनी खात्री बाळगावी की, बदल लवकरात लवकर होतील. त्यामुळे तुम्हाला येथे थांबणे सोईचे होईल आणि तुम्हाला निश्चिती मिळेल. तसेच येथील नागरिकत्व मिळविण्याचा रस्ता मोकळा होईल,’’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

ट्रम्प यांचे हे ट्वीट भारतीय व्यावसायिक आणि विशेषतः आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसाच्या नियमांमध्ये कठोर बदल केले होते. आपल्या अध्यक्षपदाच्या पहिल्या दोन वर्षांत ट्रम्प सरकारने एच-1बी व्हिसा धारकांना अमेरिकेत दिर्घकाळ राहणे तसेच नवीन व्हिसा मिळविणे कठीण केले होते. या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा यासाठी अॅपल, पेप्सीकोसह आघाडीच्या पाच डझन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र लिहिले होते.