घाईगडबडीत घेण्यात आला आलोक वर्मांना हटवण्याचा निर्णय

alok-verma
नवी दिल्ली – भ्रष्टाचाराचे कुठलेही पुरावे सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांच्या विरोधात मिळाले नव्हते तसेच केंद्रीय दक्षता आयोगाने म्हटले म्हणून तो अंतिम शब्द असू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालायचे निवृत्त न्यायाधीश ए.के.पटनायक यांनी म्हटले आहे. सीव्हीसीकडून आलोक वर्मा यांची चौकशी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने ए.के.पटनायक यांच्यावर या चौकशीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवली होती.

आलोक वर्मा यांना सीबीआय संचालक पदावरुन हटवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घाईगडबडीत घेतला अशी टीका पटनायक यांनी केली. वर्मा यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन निवड समितीने घेतला.

दरम्यान आलोक वर्मांनी राजीनामा दिला असून आलोक वर्मा यांची सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय संचालक पदावर फेरनियुक्ती केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना पदावरुन हटवण्यात आले. त्यांची वर्णी डी.जी. फायर सर्व्हिसेस अँड होम गार्ड या पदावर करण्यात आली. पण हे पद स्वीकारण्यास आलोक वर्मांनी नकार देत थेट राजीनामाच देऊन टाकला.