पी. चिदंबरम यांच्या पत्नीविरोधात शारदा घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल

p-chidambaram
कोलकाता – सीबीआयने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांच्या विरोधात शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पी. चिदंबरम यांच्या पत्नीवर चिटफंड घोटाळ्यात अडकलेल्या शारदा समुहातील कंपन्यांडून १.४ कोटी रुपये घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना सीबीआय प्रवक्ते अभिषेक दयाल यांनी सांगितले, की शारदा समुहातील कंपन्यांच्या निधीत फसवणूक आणि गैरव्यवहार करण्याचा हेतू असलेल्या, शारदा समुहाच्या मालक सुदिप्ता सेन आणि इतर आरोपींसोबत गुन्हेगारी कटात सहभागी असल्याचा आरोप नलिनी यांच्यावर आहे.

माजी केंद्रीय मंत्री मतंग सिंह यांची पत्नी मनोरंजना सिंहने सेबी आणि आरओसीसारख्या विविध संस्थांचा तपास मॅनेज करता यावा यासाठी सेन यांची ओळख नलिनी चिदंबरम यांच्याशी करून दिली होती. नलिनी यांना यासाठी त्यांच्या कंपन्यांकडून २०१०-१२ दरम्यान कथित १.४ कोटी रुपये मिळाल्याला आरोप असल्याचेही दयाल म्हणाले. कोलकात्याच्या विशेष न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment