‘रेस-४’मधून ‘भाईजान’ची गंच्छती

salman-khan
‘रेस-३’ हा बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटल्यानंतर त्याचा ‘रेस-४’ चित्रपटातून पत्ता कट करण्यात आला आहे. तो सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो या चित्रपटानंतर लगेचच ‘दबंग-३’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार असल्यामुळे ‘रेस-४’मधून त्याची गंच्छती करण्यात आली आहे.

यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान ‘रेस-४’मधून बाहेर पडल्यामुळे आता सैफ अली खानची वर्णी त्याच्या जागेवर लागली आहे. लवकरच ‘रेस’ सिरिजचे निर्माते ‘रेस-४’च्या तयारीला लागले आहेत. सैफची यात भूमिका राहणार असल्याचे बोलले जात आहे.

‘रेस’ आणि ‘रेस-२’मध्ये सैफ अली खानने मुख्य भूमिका साकारली होती. हे दोन्हीही चित्रपट सुपरहिट झाले होते. ‘रेस-३’मध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत जरी यश मिळविले असले, तरी प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे आता सलमानच्या जागी पुन्हा सैफला संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहे. कॅटरिना कैफ आणि सुनिल ग्रोवरही यात मुख्य भूमिका साकारत आहेत.