पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधी निदर्शने

Pakistan
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (पीओके) नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक रहिवासी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. यावेळी या निदर्शकांनी पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या.

युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीची (यूकेपीएनपी) विद्यार्थी शाखा असलेल्या युनायटेड कश्मीर नॅशनल स्टूडंट्स ऑर्गनायझेशन या संघटनेने ही निदर्शने आयोजित केली होती.

या निदर्शकांनी पाकिस्तानच्या वॉटर अॅण्ड पॉवर डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (डब्ल्यूएपीडीए) विरोधात घोषणाबाजी केली. तसेच या दोन नद्यांवरील जलविद्युत प्रकल्पांची बांधकामे तत्काळ थांबविण्याची मागणी केली. पाकिस्तानने स्थानिक नागरिकांना पाण्यासहित अन्य मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले आहे, असा आरोप त्यांनी केला. या प्रदेशात गंभीर पर्यावरणीय बदलांची भीती असल्यामुळे नीलम आणि झेलम नद्यांवर आणखी धरणे बांधायला लोकांचा विरोध आहे.

“हे आमचे पाणी आहे, हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत राहू. जर परस्पर समजुतीद्वारे समस्या सोडवण्यात आली नाही तर आम्हाला इतर मार्ग माहित आहेत,” असे यावेळी एका कार्यकर्त्यांने माध्यमांना सांगितल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये अलीकडे प्रचंड पाणी संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकांना अत्यंत वाईट स्थितीत जगावे लागत आहे किंवा अन्यत्र स्थलांतर करावे लागत आहे.