नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे चेअरमन अशोक चावलांचा राजीनामा

ashok-chawla
नवी दिल्ली – एअरसेल-मॅक्सिस लाचखोरी प्रकरण नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे चेअरमन अशोक चावला यांना भोवले असून त्यांनी सीबीआय चौकशी करण्याची शक्यता असल्याने पदाचा राजीनामा दिला आहे.

एअरसेल-मॅक्सिसच्या लाचखोरीच्या प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदबंरम यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव आले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) या प्रकरणाची चौकशी करत आहे. अशोक चावला यांनी जनहितासाठी एनएसईच्या चेअरमनपदाचा आणि संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे एनएसईने म्हटले आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पडत असताना त्यांनी त्वरित राजीनामा दिल्याचेही एनएसईने म्हटले आहे.

एअरसेल-मॅक्सि प्रकरणात सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. यापूर्वी पी.चिदंबरम यांच्यावरील कारवाईची केंद्रीय अर्थमंत्रालयाने परवानगी दिली होती. पण सीबीआय लाचखोरी प्रकरणातील सहभागी वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील कारवाईच्या परवानगीसाठी अजूनही प्रतिक्षा करत आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील कारवाईसाठी परवानगी घेण्यात यावी, असे आदेश सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी तपाससंस्थेला दिले आहेत. देशातील सर्वात मोठ्या शेअरबाजाराचे चेअरमन म्हणून २०१६ पासून चावला यांनी काम केले आहे. नुकताच त्यांनी वैयक्तिक कारणासाठी येस बँकेच्या कार्यकारी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे.