पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव, रोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ

team-india
सिडनी – सलामीवीर रोहित शर्मा आणि अनुभवी महेंद्र सिंह धोनीचा चा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय फलंदाजांनी झाय रिचर्डसन आणि जेसन बेहरनडॉर्फने केलेल्या भेदर माऱ्यासमोर शरणगती स्विकारली. भारत ५० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात २५४ धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ३४ धावांनी बाजी मारत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा एक हजारावा विजय ठरला आहे.

भारताची ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या चार धावांवर शिखर, विराट आणि रायुडू हे झटपट माघारी परतल्यानंतर धोनीच्या साथीने रोहित शर्माने भारताचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियन माऱ्याचा रोहित शर्माने नेटाने सामना करत १३३ धावांची शतकी खेळी उभारली. पण धोनी वगळता एकही फलंदाज त्याला योग्य साथ न देऊ शकल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात बाजी मारली. धोनीने मधल्या फळीत ५१ धावांची अर्धशतकी खेळी करुन रोहितला चांगली साथ दिली पण यासाठी त्याने तब्बल ९६ चेंडू खर्ची घातले. भारताला धोनीच्या या संथ खेळीचा फटका पुढे बसला. भुवनेश्वर कुमारने अखेरच्या फळीत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसनने ४, बेहरनडॉर्फने २ बळी घेतले. त्यांना पिटर सिडल आणि स्टॉयनिसने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

तत्पुर्वी यजमान ऑस्ट्रेलियाने पिटर हँडस्काँब, उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या वन-डे सामन्यात भारतासमोर २८९ धावांचे आव्हान ठेवले. ५० षटकात कांगारुंनी ५ गड्यांच्या मोबदल्यात २८८ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, कर्णधार फिंच त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हँडस्काँब यांनी एकामागून एक अर्धशतकी खेळी करुन संघाचा डाव सावरला. तिन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना केला. हँडस्काँबने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत यजमान संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात हँडस्काँब माघारी परतला. भारताकडून कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना रविंद्र जाडेजाने १ बळी घेत चांगली साथ दिली. मोहम्मद शमीने १० षटकात ४६ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला वेसण घातली, मात्र त्याला विकेट मिळवता आली नाही.