सीबीएसई 10 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘सोप्या गणिता’चा पर्याय

CBSE–students
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) 2020 मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताची दोन पातळ्या असलेली परीक्षा घेणार आहे. यामुळे वेगवेगळी शिक्षण क्षमता असलेले विद्यार्थी वेगवेगळ्या पातळ्या निवडू शकणार आहेत.

यातील सध्याची पातळी असलेली परीक्षा मॅथेमॅटिक्स स्टँडर्ड या नावाने तर सोप्या पातळीची परीक्षा मॅथेमॅटिक्स बेसिक या नावाने ओळखण्यात येईल, असे सीबीएसईने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. सध्याच्या या विषयाची पातळी आणि अभ्यासक्रम तेच राहतील, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार, या परीक्षांच्या दोन पातळ्या केवळ वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध राहतील असे नव्हे, तर त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांवरील एकूण तणावही कमी होईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.
“विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वात कठीण’ विषयाच्या परीक्षेपूर्वी आणि दरम्यान सर्वात जास्त तणाव जाणवतो,’ असे सीबीएसईने म्हटले आहे.

या दोन्ही पातळ्यांसाठी अभ्यासक्रम, वर्ग शिक्षण आणि आंतरिक मूल्यांकन समान राहील. जेणेकरुन विद्यार्थ्यांना वर्षभर संपूर्ण विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या योग्यतेनुसार आणि ग्रहणशीलतेनुसार त्यांना परीक्षेची पातळी ठरविता येईल, असे सीबीएसईचे म्हणणे आहे.

Leave a Comment