भाजपने आगामी लोकसभा निवडणूक जिंकली तरच देशाचे भले – अमित शहा

amit-shah
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत भाजपचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरु असून या अधिवशेनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपध्यक्ष अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणूक म्हणजे एक लढाई आहे. काँग्रेसकडे नेतृत्त्वाचा आभाव आहे. त्यामुळे ही लढाई भाजपाने जिंकली तरच देशाचे भले होईल, असे म्हटले आहे. जगात पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा प्रसिद्ध नेता नाही. देशाची जनता त्यांच्या मागे पर्वतासारखी उभी आहे. महाआघाडी असो वा काँग्रेस या सर्वांना पुन्हा एकदा पराभूत करण्याची वेळ आली असल्याचे शहा म्हणाले.

शहा भारताच्या इतिहासाचा दाखला देताना म्हणाले, भारताच्या १७०० वर्षांच्या इतिहासात एक काळ असा आला होता, की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज आणि पेशवे यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्ययुद्ध झाल्यानंतर पानीपतचे युद्ध झाले. १३० युद्धांनंतर मराठा सैन्य एक निर्णायक युद्ध हरले आणि देश तब्बल २०० वर्षे मागे गेला. तीच वेळ आजही आली आहे. नेता आणि नेतृत्त्व नसलेल्या पक्षाला मतदान केले, तर देश पुन्हा काही वर्षे मागे जाईल, असेही शहा म्हणाले.

शहा देशातील घुसखोरांसंदर्भात बोलताना म्हणाले, सर्बानंदा सोनोवाल यांचे आसाममध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही लगेचच एनआरसीला सुरुवात केली. देशातील घुसखोरांना ओळखण्याची एनआरसी ही व्यवस्था आहे. एकट्या आसाममध्ये ४० लाख घुसखोर प्रथमतः चिन्हांकित करण्यात आले. यासंदर्भात वर्तमान पत्रात जेव्हा संख्या आली. तेव्हा मला फार बरे वाटले. मी अभिनंदन करण्यासाठी राज्यसभेत गेलो. तर तेथे राहुल गांधी आणि त्यांची संपूर्ण टीम गदारोळ करत एखाद्या मावसभावाप्रमाणे, हे घुसखोर कुठे जाणार, कुठे राहणार, काय खाणार, असे प्रश्न विचारत होते. भाजपचे २०१४ मध्ये केवळ ६ राज्यांमध्ये सरकार होते. आता २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जाताना देशात १६ राज्यांत भाजपचे सरकार आहे. आम्हाला खात्री आहे की २०१९ च्या निवडणुका आम्ही बहुमताने जिंकू.