बीबीसी करतोय ‘दहशतवादी प्रचाराचा प्रसार’ – रशियाचा आरोप

bbc-news
जगप्रसिद्ध वृत्तसंस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (बीबीसी) संकेतस्थळावर आम्हाला दहशतवादी प्रचाराचा प्रसार करणारे साहित्य सापडले आहे, असे रशियाच्या मीडिया नियामक संस्थेने म्हटले आहे. या संबंधात रशियन अधिकाऱ्यांनी चौकशीही सुरू केली आहे.

रशियातील प्रसार माध्यमांची नियमनकर्ता संस्था असलेल्या ‘रोस्कोमनादझोर’ने पत्रक काढून या संबंधातील माहिती दिली आहे. “रशियाच्या कठोर दहशतवादविरोधी कायद्याचे उल्लंघन बीबीसीने केले आहे का,” याची चौकशी संस्था करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

“आजपर्यंत दहशतवादी गटांच्या वैचारिक तत्त्वांचे प्रसारण करणारे साहित्य हाती लागले आहे. बीबीसीच्या रशियन सेवेच्या संकेतस्थळावरील बातम्यांमध्ये इसिसचा नेता अबू बकर अल-बगदादी याची वक्तव्ये सापडली आहेत,” असे त्यात म्हटले आहे.

ब्रिटीश माध्यम नियामक संस्था ऑफकॉमने डिसेंबरमध्ये रशिया टुडे (आरटी) या वाहिनीवरून बातम्या आणि ताज्या घडामोडी कार्यक्रमांमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर म्हणून ‘रोस्कोमनादझोर’ने बीबीसी वर्ल्ड न्यूज वाहिनी आणि बीबीसीच्या संकेतस्थळाची चौकशी सुरू केली होती. बीबीसीवर इराणनेही आपल्या राष्ट्रीय सुरक्षेची अवहेलना केल्याचा आरोप केला होता.

Leave a Comment