मतुआ संप्रदायाला आदित्यनाथांचे कुंभमेळ्यासाठी निमंत्रण, तृणमूल नाराज

Adityanath
उत्तर प्रदेशात येत्या मकर संक्रांतीपासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालमधील मतुआ संप्रदायाला निमंत्रण दिले आहे. हा संप्रदाय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मात्र नाराज झाल्या आहेत. हे निमंत्रण राजकारणाने प्रेरित असल्याची टीका त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने (टीएमसी) केली आहे.

पश्चिम बंगालमधील 74 विधानसभा मतदारसंघात मतुआ संप्रदायाचा प्रभाव आहे. त्यामुळे टीएमसी आणि भारतीय जनता पक्ष दोन्ही पक्ष या संप्रदायाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतः ममता बॅनर्जी या संप्रदायाची अत्यंत काळजी घेतात. काही दिवसांपूर्वीच ममतांनी मतुआ महासंघाच्या प्रमुख वीणापाणी ठाकुर यांना ‘बंग विभूषण’ सन्मान दिला होता.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतुआ संप्रदायाला कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला येण्याचे निमंत्रण पाठविले आहे. बंगालमधील स्थानिक भाजप नेत्यांनी ठाकुरबाड़ी येथे जाऊन ‘सारा भारत मतुआ महासंघा’चे महासंघाधिपती मंजुल कृष्ण ठाकुर यांना हे निमंत्रण-पत्र दिले.

मात्र हे निमंत्रण टीएमसीला आवडलेले नाही. इतके दिवस कोणाला मतुआ संप्रदायाची आठवण आली नाही. निवडणुका जवळ आल्या आहेत, म्हणून हे निमंत्रण देण्यात येत आहे, असे टीएमसीच्या खासदार ममता ठाकुर यांनी म्हटले आहे. तर, ‘‘मतुआ संप्रदायातील लोक आमच्यासोबत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या सभेने ही गोष्ट सिद्ध झाली आहे. मतुआ संप्रदायातील लोक कुंभमेळ्यात नव्हे तर गंगासागरात पुण्यस्नान करतात,” असे त्यांनी म्हटले आहे.