पांड्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर काय म्हणाला विराट ?

virat-kohli
करण जोहरच्या कॉफी विथ करण या टॉक शोमध्ये भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्णधार विराट कोहलीने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या वादग्रस्त वक्तव्याच्या बाजूने आम्ही संघ म्हणून उभे नाही. चौकशी सुरू असून आम्ही निर्णयाची वाट पाहत असल्याचे विराटने म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांना कॉफी विथ करण या करण जोहरच्या टॉक शोमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. या दोघांनी या कार्यक्रमात गप्पांच्या ओघात केलेल्या लूज कमेंट्समुळे हे दोन खेळाडू अडचणीत आले आहेत. महिलांबाबत हार्दिक पांड्याने केलेली वक्तव्य सेक्सिस्ट असल्याचे आरोप झाले आणि पांड्याने त्यावर माफीही मागितली. पण आता याची बीसीसीआयने दखल घेतली आहे.

स्त्रियांच्या हालचालींचे निरीक्षण मला करायला आवडते, अशा अर्थाचे वक्तव्य हार्दिक पांड्याने करण जोहरने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केले होते. हार्दिक आणि राहुल या दोघांनाही बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि 24 तासात या दोघांनी त्याला उत्तर देणे अपेक्षित असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

टीम इंडियाचे दोन प्रसिद्ध खेळाडू केएल राहुल आणि हार्दिक पांड्या बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करणमध्ये शोमध्ये आले होते. हार्दिकने शोमध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज असल्याचे सर्वात मोठे वक्तव्य केले. सचिनच्या चाहत्यांनी त्यावर सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त केला होता. सचिनच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिक पांड्यावर टीकेचा भडीमार केला. आता त्यावर हार्दिकने सगळ्यांची माफी मागितली आहे.