उत्तर प्रदेशातील समीकरणे बदलणार ‘बुआ-भतीजा’

combo
लखनौ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश सिंह यादव व बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचे विभाजन टाळण्यासाठी व भाजपला टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (शनिवार) समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. ही घोषणा अखिलेश यादव आणि मायावती संयुक्त पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत.

विविध पक्ष मोदी सरकारला हटवण्यासाठी एकत्र येत आहेत. यात पूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या पक्षांचाही समावेश आहे. उद्या सप आणि बसपच्याही बहुप्रतीक्षित युतीची घोषणा होणार आहे. उत्तर प्रदेशातील कैराना, गोरखपूर आणि फुलपूर येथे मागील वर्षी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही हे दोन पक्ष यापूर्वी एकत्र येऊन लढले होते. तिन्ही ठिकाणी या युतीला यश आले होते. या युतीची घोषणा मकर संक्रांतीदिवशी होईल, असा अंदाज लावण्यात येत होता. पण ३ दिवस आधीच युतीची घोषणा करण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला आहे. ही पत्रकार परिषद लखनौमधील गोमती नगर येथील ताज हॉटेलमध्ये होणार आहे.

Leave a Comment