राजकीय जाहिरातीत पारदर्शकता यावी, यासाठी ट्विटरचे खास डॅशबोर्ड

twitter
नवी दिल्ली – यावर्षात देशातील लोकसभा निवडणुका पार पडणार असल्याने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या रडारवर सोशल मीडियावरील जाहिराती आल्या आहेत. ट्विटर राजकीय जाहिरातीत पारदर्शकता यावी, यासाठी खास डॅशबोर्ड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे. कोणता राजकीय पक्ष ट्विटरवरील जाहिरातीकरिता खर्च करत आहे, यातून पाहता येणार आहे.

निवडणूक आयोगाचे अधिकारी, राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांना अमेरिकन सोशल मीडिया कंपनी ट्विटर ही प्रशिक्षण देणार आहे. संशयास्पद, आक्षेपार्ह अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या माहितीबाबत तक्रार करण्याची माहिती या प्रशिक्षणात दिली जाणार आहे. याची अंमलबजावणी अमेरिकेत गतवर्षी करण्यात आल्याची माहिती ट्विटरचे उपाध्यक्ष (सार्वजनिक धोरण) कोलीन क्रॉवेल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

पुढील काही आठवड्यात ट्विटरकडून वापरकर्त्यांना ‘अॅड्स ट्रान्सपरन्सी’ हे फिचर देण्यात येणार आहे. भारतात त्यासाठी विशेष सुविधा देण्याबाबत काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. यातुन जाहिरात कोणी दिली आहे. जाहिरातीसाठी किती खर्च केला जात आहे. जाहिरात कोणत्या भौगोलिक क्षेत्रात दाखविली जात आहे याची माहिती मिळणार आहे. कोणते ट्विट ही जाहिरात पुरस्कृत आहे, हे लोकांना समजण्यासाठी पारदर्शक पद्धत आहे.

याबाबत माहिती देताना ट्विटर इंडियाच्या संचालक महिमा कौल यांनी सांगितले की, उमेदवारांकडील माहिती ही विश्वासहर्तेकरिता थेट राजकीय पक्षांकडून घेतली जाणार आहे. ट्विटरवर जाहिरात देण्याकरिता निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र बंधनकारक असल्याची त्यांनी पुस्ती जोडली. नागरिकांना चर्चेकरिता प्रोत्साहन मिळावे व नेत्यांचाही सहभाग वाढावा यासाठी ट्विटरने #ChaupalOnTwitter हा हॅशटॅग आणला आहे.