डेमोक्रॅट्ससोबत बैठकीतून ट्रम्प यांचा ‘सभात्याग’, म्हणाले वेळेचा अपव्यय

donald-trump
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी डेमोक्रॅटिक पक्षासोबतची बैठक अर्ध्यावर सोडून काढता पाय घेतला. ही बैठक म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय असल्याचे त्यांनी म्हटले.

अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी उभारण्याबाबत ट्रम्प आणि विरोधकांमध्ये बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अचानक संपल्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले, मात्र त्यासाठी दोषी कोण यावर दोन्ही बाजूंनी वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले. ही भिंत बांधावी, असा ट्रम्प यांचा आग्रह असून विरोधकांचा त्याला विरोध आहे.

“संपूर्ण वेळेचा अपव्यय. मी बाय-बाय म्हणालो, दुसरे काहीही चालत नाही!” असे ट्रम्प यांनी या बैठकीबद्दल ट्विट केले.

सिनेटमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते चक शूमर यांनी पत्रकारांना सांगितले, की “ट्रम्प यांनी मेजावर मारल्यासारखे केले आणि उठून बाहेर चालू लागले.”
“त्यांच्या मनासारखे झाले नाही म्हणून त्यांनी संताप केल्याचे आम्हाला परत दिसून आले,” असे शूमर म्हणाले.

दुसरीकडे, “डेमोक्रॅटिक नेते वाटाघाटी करण्यास इच्छुक नाहीत, हे आम्ही पुन्हा एकदा ऐकले,” असे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सांगितले.
धोकादायक बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याची गरज आहे. त्यासाठी 5.7 बिलियन डॉलर्सची गरज आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment