शीला दीक्षित यांची दिल्ली काँग्रेसच्या प्रमुखपदी निवड

sheila-dixit
नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असतानाच दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची दिल्ली पक्षप्रमुखपदी काँग्रेसने निवड केली आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून पदभार काढून तो आता दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री असलेल्या शीला दीक्षित यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आपचे कडवे टीकाकार असलेल्या माकन यांना हटवून दीक्षित यांची निवड करण्यामागे काँग्रेसची आम आदमी पक्षाशी वाढती जवळीक हे कारण सांगितले जात आहे.

चंद्राबाबू नायडू आणि डीएमके प्रमुख स्टॅलिन यांनी भाजपविरोधात महाआघाडीत समाविष्ट होण्यासाठी केजरीवाल यांची मनधरणी केली होती. मोदी – शाह यांच्या जोडगळीला हरवणे ही प्रत्येक देशभक्ताची जबाबदारी असून त्यासाठी आवश्यक ती पावले उचलू, असे म्हणत मागच्या महिन्यात केजरीवाल यांनी महाआघाडीत जाण्याचे संकेत दिले होते. माकन यांच्या ऐवजी दीक्षित यांची नियुक्ती हे काँग्रेस आम आदमी पक्षाला महाआघाडीत घेण्यास उत्सुक असल्याचे द्योतक मानले जात आहे. शीला दीक्षित यांना महाआघाडीविषयी विचारले असता त्यांनी राहुल गांधी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे म्हणत सूचक संकेत दिले.

दिल्लीतील लोकप्रिय आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या ८० वर्षीय शीला दीक्षित नेत्या आहेत. १९९८ ते २०१३ दरम्यान त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. पक्षप्रमुखांनी राजस्थान आणि मध्यप्रदेशात तरूण तुर्कांना डावलून पक्षाने जेष्ठ नेते अशोक गेहलोत व कमलनाथ यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड केली होती. शीला दीक्षित यांच्या दिल्ली पक्षप्रमुखपदाच्या निवडीने काँग्रेसची मदार अद्यापही जुन्या निष्ठावान नेत्यांवरच कायम असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.