आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन

sammelan
यवतमाळ – आजपासून यवतमाळ येथे ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ होत असून या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आयोजन समितीच्या सूचनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलेच्या हस्ते होणार असल्याची माहिती महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर यांनी दिली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय बैठकीमुळे उद्घाटनास येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

संमेलनाचे उद्घाटन यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वैशाली येडे करतील. वैशाली शेतकरी पतीच्या आत्महत्यानंतर हालअपेष्टा सहन करून त्याच्याशी निर्धाराने लढा देत सध्या सन्मानाने जगत आहेत. ‘तेरवे’ या शेतकरी विधवांच्या लढ्याची कहाणी असलेल्या नाटकात भूमिका साकारून त्यांनी या प्रश्नाला तेवत ठेवले आहे.

निमंत्रित वक्ते, कवी, लेखकांनी बहिष्कार असलेल्या कार्यक्रमांचे, टॉक शोचे, मुलाखती, सत्काराचे नियोजन अखेर पांगले. आता यादरम्यान मान्यवरांचा सत्कार, टॉक शो, प्रकट मुलाखत होणार नाही. विद्या बाळ यांचा सत्कार, प्रभा गणोरकर यांची मुलाखत होणार नाही. ‘माध्यमांची स्वायत्तता नेमकी कुणाची?’ हा टॉक शो रद्द करण्यात आला.

संमेलनाच्या इतिहासात प्रथमच ‘प्रभारी अध्यक्ष’ महामंडळाचे प्रतिनिधित्व करतील. श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्यामुळे उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महामंडळाची बैठक झाली. त्या म्हणाल्या, नयनतारा सहगल यांना महामंडळाच्या वतीने एक पत्र पाठवण्यात येणार आहे. मात्र, त्यांचे भाषण वाचले जाणार नाही.

Leave a Comment